नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, तेलुगुदेशम पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईव्हीएममध्ये होणाऱ्या बिघाडावरुन टीका केली आहे. ईव्हीएममध्ये बिघाड आहे की भाजपाला मतदान आहे असा प्रस्न त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊनही ईव्हीएम यंत्रणेत बिघाड कशाने होत आहे. निवडणुकीवर 50 हजार करोड खर्च केले जातात. मग अशाप्रकारे बेजबाबदार का? असं अखिलेश यादव यांनी सांगितले आहेत.
तर दुसरीकडे आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. जगभरातील 191 देशांपैकी फक्त 18 देश ईव्हीएमवर निवडणुका घेत आहेत. तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही ईव्हीएम मशीनसोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅटवर 50 टक्के पावती दिसत नसल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी कोणत्याही मतदाराला मतदान केलं तरी भाजपाला मतदान होत असल्याचा आरोप केला. गोवामध्ये आम्ही पडताळणी केली तेव्हा 4 पक्षाला प्रत्येकी 9-9 मतं टाकण्यात आली त्यानंतर चौकशीत भाजपाला 17 मतं पडल्याचं दिसून आलं असा दावा केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी सांगितले की, मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते असं शरद पवारांनी सांगितले. मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आली.
आयकर विभाग, ईडी या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जातो.रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. सरकारी संस्थांचा दुरुपयोग करुन विरोधकांच्या घरावर छापे पाडण्यात येतात. त्यामुळे ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित होऊन त्याचा मतदारांवर परिणाम होईल असा आरोप विरोधकांनी केला आहे.