लोकसभा निवडणुकीत मोदी लाट-२ उसळल्यानंतर आज एनडीएच्या नेतेपदाची माळ नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडली असून ३५३ खासदारांनी पंतप्रधानपदासाठी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आजच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटू मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. हे आपलं 'सरकार पार्ट २' कसं चालवायचंय, या संदर्भात मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं.
'देशवासीयांनी प्रचंड जनादेश दिला आहे आणि तो जबाबदारी वाढवणारा आहे. भारतीय लोकशाही आपल्याला समजून घ्यावी लागेल. मतदारांचा नीरक्षीरविवेक कुठल्याही पट्टीने मोजता येणार नाही. लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होतेय. सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते. सत्तेच्या खुर्चीत बसून हा सेवाभाव जपणं कठीण जाऊ शकेल. पण सत्ताभाव जसजसा कमी होत जाईल, तसतसा सेवाभाव वाढत जाईल आणि जनतेचा विश्वासही दृढ होईल', असा मोलाचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी दिला.
* मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देः
>> जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही.
>> खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करायचंय. मीही तुमच्यातलाच एक आहे. फक्त, आपल्या सरकारकडून कधी काही चूक झाली, तर तिची जबाबदारी एका खांद्यावर घेणारा एक नेता हवा, म्हणून मीही जबाबदारी स्वीकारतोय आणि ती पारही पाडेन.
>> संविधानाने आपल्याला जबाबदारी दिली आहेच, पण मानवीय दृष्टिकोनातूनही मनं जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा.