युती फिसकटल्यानंतर केजरीवाल यांची शीला दिक्षित यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:20 PM2019-03-27T13:20:42+5:302019-03-27T13:20:52+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युतीसाठी दीक्षित इच्छूक नसून काँग्रेसचे इतर नेते युतीसाठी उत्सुक आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीत काँग्रेससोबतची युतीची बोलणी फिसकटल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यावर हल्लाबोल केला. याआधी दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी दीक्षित यांच्यामुळेच दिल्लीची वाईट स्थिती झाल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युतीसाठी दीक्षित इच्छूक नसून काँग्रेसचे इतर नेते युतीसाठी उत्सुक आहेत.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही पक्षांनी मागील ७० वर्षांत केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. देशातील स्थिती बदलण्यासाठीच मला आम आदमी पक्षाची स्थापन करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. मागील ७० वर्षांत काँग्रेस आणि भाजपने केवळ आपले घर भरले. तर मागील चार वर्षात मोदी सरकारने दिल्लीत आम्हाला काम करण्यापासून रोखले. यामुळे केवळ जनतेचे नुकसान झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा आवश्यक असून त्यासाठी दिल्लीतील आपच्या सर्व जागा निवडून देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत तीन सभा घेतल्या. यामध्ये रोहिनी, मोतीनगर आणि चांदनीचौक येथील सभांचा समावेश होता.
दरम्यान आप आणि काँग्रेस यांच्या युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. परंतु, त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे 'आप' आणि काँग्रेसची युतीची बोलणी पुन्हा फिसकटल्याचे चित्र आहे.