नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास सूचना केल्यास आपण तयार असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले. केरळमधील वायनाड येथे राहुल यांचा प्रचार करण्यासाठी प्रियंका गांधी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाराणसीमध्ये लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.
राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यास आपण तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवतात. प्रियंका यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविल्यास भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लढत ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तर प्रियंका यांनी वाराणसीमधून निवडणूक लढविल्यास त्याचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. त्यामुळे वाराणसी मतदार संघातील स्थिती समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.
- २०१४ मध्ये मोदींनी आपले प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांना ३ लाख ७७ हजार मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी मोदींना ५ लाख ८१ हजार २२ मते मिळाली होती. तर केजरीवाल यांनी २ लाख ९ हजार २३८ मते मिळवली होती.
- याच निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते. त्यांना ७५ हजार मते मिळाली होती. त्यापाठोपाठ बीएसपीला ६० हजार, सपाला ४५ हजार मते मिळाली होती. यामध्ये आप, सपा, बसपा आणि काँग्रेसचे मते जोडल्यास एकून ३ लाख ९० हजार ७२२ मतं होतात.
- या सर्व पक्षांची एकूण मते मोदींच्या विजयाच्या फरकापेक्षा अधिक होतात. सपा आणि बसपाने अमेठी आणि रायबरेली मतदार संघात काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिला नाही. तोच पॅटर्न प्रियंका यांनी वाराणसीतून निवडणूक लढविल्यास सपा-बसपा राबवणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
- वाराणसीमध्ये बनिया समाजाची लोकसंख्या ३.२५ आहे. हा समाज भाजपचा प्रमुख मतदार समजला जातो. परंतु, नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दावर नाराज असलेल्या बनिया समाजाचे मते वळविण्यास काँग्रेसला यश आल्यास वाराणसीमध्ये मोदींसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
- वाराणसीमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अडीच लाख आहे. विश्वनाथ कॉरिडोर बनविण्यासाठी ब्राह्मण समजाचे घरं मोठ्या प्रमाणात जाणार आहे. तसेच एसटी/एसटी कायद्यामुळे ब्राह्मण समाज सरकारवर नाराज आहे. या मतदारांवर उभय पक्षांची नजर असणार आहे.
- यादवांची संख्या या मतदार संघात दीड लाखांच्या जवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यादव समाज भाजपचा मतदार आहे. मात्र सपाच्या पाठिंब्यानंतर ही मते काँग्रेसकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे.
- वाराणसीत तीन लाखांच्या जवळ मुस्लीम समाज आहे. भाजपला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच मुस्लीम समाज मतदान करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
- भूमीहार सव्वा लाख, राजपूत एक लाख, पटेल दोन लाख, चौरसिया ८० हजार, दलित ८० हजार आणि इतर मागासवर्गीयांची ७० हजार मते वळविण्यास प्रियंका यांना जमले तर निकाल अनपेक्षीत लागू शकतो.
- आकडेवारीवरून असंच दिसत की जातीची समीकरणे जुळल्यास प्रियंका गांधी वाराणसीतून मोदींना चांगलीच टक्कर देऊ शकतात.
- मागील साडेचार वर्षांत मोदींनी वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने विकास केला, त्यावरून मतदार त्यांना डावलतील, याची शक्यता फारच कमी आहे.