नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाकिस्तानला खडसावताना आमच्याकडे देखील अणुबॉम्ब असून ते काही दिवाळीसाठी ठेवले नसल्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या अणुबॉम्बच्या धमकीला आम्ही घाबरत नसल्याचे मोदींनी लोकसभा निवडणूक प्रचारातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत 'अणुबॉम्ब'चा विषय देखील गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून शहिद जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आता मोदींनी लोकसभा निवडणुकीत अणुबॉम्बचा विषय छेडला आहे. याआधी लातूर येथे झालेल्या सभेत मोदींनी तरुणांना आवाहन केले होते की, तुमच पहिलं मत जवानांना श्रद्धांजली म्हणून भाजपला द्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी सैन्यांच्या बलिदानावर राजकारण करत असल्याची टीका झाली होती. अनेक सभांमध्ये मोदी सैन्याच्या शौर्यावर भाजपला मतदान करण्यात आवाहन करत आहे. वास्तविक पाहता निवडणूक आयोगाकडून प्रचारात सैन्यांचा उल्लेख करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मोदींकडून सर्रास सैन्यांच्या शौर्याचा उल्लेख जाहीर सभांमधून करण्यात येत आहे.
दरम्यान २०१९ लोकसभा निवडणूक विकास आणि बेरोजगारीच्या मुद्दांपेक्षा राष्ट्रवादाच्या मुद्दावर अधिक गाजत आहे. भाजपकडून राष्ट्रवादावर अधिक भर दिला जात आहे. तर विरोधकांनी बेरोजगारी, नोटबंदी आणि शेतकऱ्यांच्या समस्या लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पंतप्रधान मोदींनी आमच्याकडेचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवले नसल्याचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबंधामुळे राजकारणा तापणार अशी शक्यता आहे.
राजस्थान येथील बाडमेरच्या सभेत मोदी म्हणाले, की आम्ही अतिरेक्यांच्या मनात भिती निर्माण केली आहे. देशात नेहमीच अतिरेकी हल्ले व्हायचे, पंरतु, हे सर्वकाही बंद झालं आहे. ही केवळ तुमच्या मताची ताकत आहे. आम्ही पाकिस्तानाचा ताठरपणा काढून टाकला असून त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आणल्याचे मोदी म्हणाले.