नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. निवासस्थानी त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी मोदी यांच्या कपाळावर टिळा लावून त्यांचे स्वागत करत त्यांचे तोंड गोड केले. या वेळी त्यांनी मोदी यांना एक नारळ, 500 रुपये आणि मिश्री (मिठाई) भेट दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही मोदींनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेतले होते. गुजरात राज्यामध्ये 26 जागांसाठी मतदान होत आहे. काही वेळ आईसोबत गप्पा मारल्यानंतर मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.
Lok Sabha Election 2019 : व्होटर ID हे दहशतवाद्यांच्या IED पेक्षा जास्त शक्तिशाली - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीतील या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यावर पवित्रतेचा अनुभव येतो. तसेच लोकशाहीत मतदान करुन पवित्रतेचा अनुभव येतो. देशातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी उत्साहाने या मतदान प्रकियेत सहभागी व्हावे. भारतीय मतदार हा समजूतदार आहे. त्याला खरे आणि खोटे समजते' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.