मोदींना पुन्हा फळणार का 'पाकिस्तान का प्यार'?
By कुणाल गवाणकर | Published: April 10, 2019 03:36 PM2019-04-10T15:36:34+5:302019-04-10T15:57:15+5:30
मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे
- कुणाल गवाणकर
पाकिस्तान आपल्या कर्माने मरेल.. आपण पुढे जायला हवं.. आठवड्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मैं भी चौकीदार' कार्यक्रमात केलेलं हे विधान.. त्यांच्या या विधानामुळे मोदींच्या पुढच्या भाषणांमध्ये तरी पाकिस्तान, एअर स्ट्राईक नसेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती.. मात्र गेल्या आठवड्याभरातली मोदींची भाषणं ऐकली, तर त्यांनी हे दोन्ही मुद्दे सोडलेले नाहीत.. 2014 मधला विकास मात्र बेपत्ता झालाय.. अर्थात पाकिस्तान आपल्या कर्माने मरेल.. आपण पुढे जायला हवं, हे विधान मोदींनी 1 एप्रिलला केलं होतं.. त्यामुळे त्यांनी जनतेला फूल बनवलं असावं, असं मानण्यास जागा आहे..
तर मोदींचं हे पाकिस्तान पुराण सुरू असताना आता इम्रान खान यांनी थेट मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत, असं म्हटलंय.. ज्या देशाला मोदींनी चोख प्रत्त्युत्तर दिल्याचा दावा केला जातो, त्याच देशाचा पंतप्रधान मोदीच पुन्हा निवडून यावेत, असं म्हणतोय.. गेले काही दिवस मोदी सतत काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाकिस्तानशी जोडत आहेत.. काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतोय, असा मोदींचा स्पष्ट आरोप आहे.. त्यामुळे खरंतर आदरणीय मोदींचा दावा पाहता पाकिस्ताननं काँग्रेससाठी बॅटिंग करायला हवी होती.. पण नेमकं उलट घडलंय..
पाकिस्ताननं, इम्रान खाननं काँग्रेसला सत्ता मिळावी, असं म्हटलं असतं, तर काय झालं असतं याची जरा कल्पना करा.. भाजपानं टीकेची झोड उठवली असती.. पक्षाध्यक्ष अमित शहांनी जुनेच फटाके नव्याने काढले असते.. काँग्रेस पक्ष जिंकला तर पाकिस्तानात फटाके फुटतील, असं म्हणत फटाक्यांची माळ पेटवून दिली असती.. सुषमाजींनी 'स्वराग' आळवला असता.. इराणींच्या स्मृती जागा झाल्या असत्या आणि बरंच काही.. गेलाबाजार आदित्यनाथांनीदेखील हिरवा व्हायरस वगैरे म्हटलं असतं.. पण इम्रान खान यांनी मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्यानं ती सोय राहिलेली नाही.. इथे मुद्दा काँग्रेसचा नाही, तर भाजपा अशा परिस्थितीत कसा वागला असतं, हे दाखवण्याचा आहे..
इम्रान खान यांच्या विधानाचा पुढील भागदेखील लक्षात घ्यायला हवा.. काँग्रेस सत्तेवर आल्यास विरोधात असलेला भाजपा दबाव आणेल.. त्यामुळे दोन देशांमध्ये संवाद होऊ शकणार नाही.. त्याउलट मोदी सत्तेवर आल्यास संवाद शक्य आहे, असं खान म्हणाले.. याचा अर्थ भाजपा सत्तेवर आल्यास भूमिका संवादाची असेल.. पण तोच भाजपा विरोधी पक्षात असल्यास त्यात पूर्णपणे बदल झालेला असेल, असं खान यांना वाटतं.. पाकिस्तानबद्दलचं मोदी सरकारचं धोरण पाहिल्यास यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे..
गोळ्यांच्या आवाजात चर्चा होऊ शकत नाही, अशी सत्तेत येण्याआधीची मोदींची भूमिका होती.. पण मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित होते.. तो चर्चा सुरू करण्याचा, पाकिस्तानला एक संधी देण्याचा भाग होता, असं भाजपा समर्थकांचा आणि दावा असतो.. पण त्यावेळीही सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच होतं.. त्यानंतर मोदी 25 डिसेंबर 2015 ला मोदी अनपेक्षितपणे पाकिस्तानला गेले.. शरीफ यांची गळाभेट घेतली.. आणि त्यानंतर आठवड्याभरात पठाणकोटमध्ये हल्ला झाला.. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर आयएसआयला हल्ला स्थळाची पाहणी करण्याची परवानगी देण्यात आली.. या भेटीने नेमकं काय साधलं, हे मोदींनी सव्वासो करोड देशवासियांना सांगितलं तर खूप बरं होईल..
मोदींकडून पाकिस्तानचा निवडणुकीत थेट वापर केला जातो, याची उदाहरणं ढिगानं देता येतील.. 2017 मध्ये मोदींच्या गुजरातमध्ये निवडणूक होती.. त्यातही मोदींनी पाकिस्तानला आणलं.. पाकिस्तानला गुजरातमध्ये मुस्लिम मुख्यमंत्री हवाय, असा मोदींचा दावा होता.. मोदींचा रोख काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावर होता.. पण यातला सर्वाधिक गंभीर आरोप होता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरचा.. मनमोहन सिंग, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि एक माजी उपराष्ट्रपती पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना, माजी परराष्ट्र मंत्र्यांना भेटले.. त्यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याचा खळबळजनक आरोप मोदींनी केला आणि तोही जाहीरपणे.. तारीख होती 10 डिसेंबर 2017.. ठिकाण होतं पालनपूर...
निवडणूक झाली.. भाजपानं गुजरात राखलं.. पण मोदींच्या आरोपांचं काय झालं, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.. देशाचे माजी पंतप्रधान पाकिस्तानच्या नेत्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत बैठका करतात, निवडणुकीच्या तोंडावर अशी गुप्त बैठक कशासाठी, असं म्हणत मोदींनी त्यांना जवळपास देशद्रोही ठरवलं.. या दाव्यात तथ्य होतं, तर सिंग यांच्यासह अय्यर आणि हमीद अन्सारी (अन्सारी यांचं नाव नंतर अमित शहांनी घेतलं) यांची चौकशी व्हायला हवी होती.. पण तसं काहीही झालं नाही.. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी हा गंभीर आरोप करण्यात आला.. 27 डिसेंबरला अर्थमंत्री अरुण जेटलींनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.. 'मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांच्या देशाबद्दलच्या भावनेवर शंका उपस्थित करण्याचा मोदींचा हेतू नव्हता,' असं जेटली म्हणाले.. पण मोदींनी गंभीर आरोप जगजाहीरपणे केले होते.. त्याबद्दल त्यांना काहीच वाटलं नाही.. दिलगिरी व्यक्त केली जेटलींनी आणि ती भर सभेत वगैरे नसल्याने कोणाच्या फार लक्षात राहण्याचं कारण नाही..
मोदींकडून निवडणुकीत सर्रास पाकिस्तानचा वापर केला जातो.. गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये हेच घडलंय.. आताही मोदी तेच करताहेत.. जवानांचा उल्लेख प्रचारात करू नका, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितलं असूनही मोदींना फरक पडत नाही.. कालचं लातूरमधलं भाषण हे त्याचंच उदाहरण.. तरुण मतदारांनो, तुमचं पहिलं मत पुलवामातील शहीद जवानांनासाठी द्या.. ते थेट मोदींना मिळेल, असं आवाहन मोदींनी केलं.. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, त्यात 40 जवानांचे गेलेले प्राण याचा असा 'वापर' मोदींनी केला.. खरंतर 40 जवानांचं हौतात्म्य ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब.. पण तो मुद्दाही मोदींनी सोडला नाही.. इथे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चित्रपटातल्या 'अरे ज्याची लाज वाटायला हवी, त्याची अभिमानानं पाटी कसली लावता', हा संवाद आठवल्याशिवाय राहत नाही.. जिथं लाजिरवाण्या हल्ल्याचा वापर झाला, तिथे अभिमानास्पद एअर स्ट्राइक कसा सुटेल?.. त्यामुळेच की काय त्याच भाषणात मोदींनी एअर स्ट्राइक केलेल्या जवानांसाठी मतदान करा, असं म्हणत मतांचा जोगवा मागितला..
मोदींचा निवडणूक प्रचार आणि पाकिस्तान हे आता समीकरणच झालंय.. यंदाची निवडणूक तर 2014 चीच वाटू लागलीय.. गेल्या निवडणुकीतलचे मुद्दे या निवडणुकीत आहेत.. काँग्रेसचा भ्रष्टाचार, पाकिस्तान, दहशतवाद याचा मोदींकडून बेसुमार वापर सुरूच आहे.. मोदी अजूनही विरोधातच आहेत.. गेली 5 वर्ष देशात काँग्रेसचंच सरकार होतं की काय, असं वाटू लागलंय.. गेल्या 5 वर्षांत काय झालं, काय विकास झाला, अच्छे दिन आले का, परदेशातला किती काळा पैसा देशात आला, नोटाबंदीनं किती काळा पैसा उजेडात आला, तो कोणाचा होता, जीएसटीनं महसूलात किती वाढ झाली, यावर मोदी बोलायला तयार नाहीत.. मात्र पाकिस्तान पुराण जोरात आहे.. आता पाकिस्तानातून इम्रान खान यांनीही सूर आळवला आहे... मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे.. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत 'अब की बार पाकिस्तान का प्यार' मिळणार का आणि 23 मे रोजी पाकिस्तानात फटाके फुटणार का ते पाहणं खरंच औत्सुक्यपूर्ण ठरेल..