आसनसोल - हातावर मोजण्याइतक्या जागा लढविणाऱ्या ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली आहेत. जर पंतप्रधानपदाचा लिलाव होत असता तर ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली असती. जेवढे या लोकांनी देशाला लुटलं आहे तो सगळा माल बाहेर आला असता. मात्र पंतप्रधानपद हे लिलावात मिळत नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला लगावला आहे.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकशाहीला हायजॅक करण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये होत आहे मात्र यावेळी बंगालमधल्या जनतेने तृणमूल काँग्रेसला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. आज देशातील सरकारी भ्रष्टाचार बाहेर काढले तर टीएमसी आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा होईल. भ्रष्टाचार पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचाराचा चढता आलेख पश्चिम बंगालच्या सरकारची कामगिरी आहे. गरिबांना लुटणाऱ्याची बाजू एका राज्याचा मुख्यमंत्री घेत असेल तर जनतेला सगळं समजतं असा टोला मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला.
हिंसा, दहशतवादी, घुसखोरी आणि तस्करी या राजनितीसोबत पश्चिम बंगालची जनता राहणार नाही. पश्चिम बंगालमध्ये नव्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. नवीन मतदार ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाला थारा देणार नाही असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच टीएमसीच्या रॅलीमध्ये लोकं सहभागी होत नाहीत म्हणून त्यांना परदेशी कलाकारांना रॅलीत बोलवावं लागतं असा चिमटाही मोदी यांनी काढला. यापुढे पश्चिम बंगालचं भविष्य आणि देशाची दिशा हे भारत माता की जय बोलणारेच ठरवणार आहेत. भाड्याच्या गुंडांच्या जीवावर सरकार चालविण्याची परंपरा बंद करणारच असंही मोदी यांनी सांगितले.
हा नवीन भारत सुरक्षेची हमी मागतो, सन्मान मागतो. आपल्या उत्सवांमध्ये पूजा, यात्रा काढण्याचं स्वातंत्र मागतोय. जगभरात नवीन भारताचा दबदबा बनणं गरजेचे आहे, तुमच्या एका मताने भारतीय जवानांना ताकद मिळेल, तुमच्या एका मताने आपली मिसाईल शत्रुचं सॅटेलाईट पाडू शकते. त्यामुळे भाजपाला मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलं.