नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी वाराणसीमध्ये दाखल होणार असून ते दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी मोदी दहा किलोमीटर रोडशो करणार आहेत. तसेच २६ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी भव्य तयारी करण्यात आली असून मुस्लीम महिलांचा एक समूह मोदींचे स्वागत करणार आहे. यावेळी एनडीएचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीसाठी सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदी वाराणसीत दाखल होणार आहेत. उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी मोदी वाराणसीत रोडशो करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे. यावेळी मोदीजी १० किमी प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. २०१४ मध्ये देखील मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गंगा आरती केली होती.
मोदींच्या वाराणसी येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी खुद्द भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली आहे. त्यासाठी शाह दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आले होते. रोड शोच्या माध्यमातून मोदींच्या लोकप्रियतेचे दर्शन घडविण्याचा भाजपचा मानस आहे.
उद्धव ठाकरेंची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना एनडीएतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीयमंत्री रामविलास पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. तर तीन तलाकपासून मुक्ती मिळवून दिल्याबद्दल मुस्लीम महिलांकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींचे स्वागत करण्यात येणार आहे.