भोपाळ - सडेतोड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवारी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच हिंदू आतंकवादाच्या त्या आरोपी असल्याचं स्वराने म्हटले आहे.
भाजपने अतिरेकी कारवाई आणि हत्येची आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपण काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचार कऱण्यासाठी भोपाळमध्ये आल्याचे सांगताना स्वरा यावेळी म्हणाली की, हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले आहे. मात्र आतंकवादाला धर्म नसतो. परंतु, अतिरेक्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले.
प्रज्ञा ठाकूरला आपण हिंदू अतिरेकी समजता का, असा प्रश्न स्वरा भास्करला विचारण्यात आला. त्यावर स्वरा म्हणाली होय, प्रज्ञा ठाकूर स्वत:ला हिंदू समजत असेल आणि ती हिंदू आतंकवादाची आरोपी आहे, तर मी तिला हिंदू आतंकवादाची आरोपी मानते.
देशाच्या संविधानाला आदर्श मानणाऱ्या विचारधारेसोबत आपण आहोत. मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. तो माझ्या विचारांशी जुळतो. काँग्रेसचा जाहिरनामा कौतुकास्पद आहे. यामध्ये देशातील जनतेच्या मुळ प्रश्नांना हात घालण्यात आला आहे. यामध्ये अल्पसंख्याक, मागास आणि दलितांचा मुद्दा घेण्यात आला आहे. त्यात हिंसेला विरोध आहे. त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे स्वरा भास्करने सांगतिले.
दरम्यान प्रज्ञा ठाकूर जे रुप घेऊन राजकारणात दाखल झाल्या आहेत, ते खरच धोकादायक आहे. राजकारण आणि गुन्हेगारी दोन्ही बाजू प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा विरोध करण्यासाठी भोपळमध्ये दाखल झाल्याचे स्वरा भास्करने सांगितले.