नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले. याबद्दल आज दिल्लीत 19 पक्षांची बैठकदेखील झाली. यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील चिंता व्यक्त केली. ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आयोगाची आहे, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. ईव्हीएमच्या वाहतुकीत हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना सकाळपासून समोर आल्या. त्याबद्दल मुखर्जींनी चिंता व्यक्त केली. 'आपल्या लोकशाहीच्या गाभ्यालाच आव्हान देणाऱ्या अशा प्रकारच्या शंकांना स्थान असता कामा नये. जनादेश पवित्र आहे आणि त्यात संशयाला कोणतीही जागा नसावी,' असं मुखर्जींनी त्यांच्या निवेदनात नमूद केलं आहे. ईव्हीएम सुरक्षित राखण्याची आणि सर्व शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचंदेखील त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 7:11 PM