नवी दिल्लीः अनेक राज्यांमध्ये असलेली सरकारविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी), विरोधकांमध्ये वाहू लागलेले एकीचे वारे आणि 'मित्रपक्षांमधील नाराजीचा सूर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं 'मिशन २०१९' कठीण झाल्याचं चित्र असतानाच, या जोडगोळीला एक चाणाक्ष जादुगार सापडल्याचं समजतं. किंबहुना, २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यापासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय. हा जादुगार दुसरा-तिसरा कुणी नाही, तर निवडणूक रणनीतीचा बादशहा प्रशांत किशोर आहे.
निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील 'मास्टरी' सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखलीय. त्यामुळे २०१२ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी २०१४ची लोकसभा निवडणूक; प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं. अर्थात, काही निवडणुकांमध्ये हा राजकीय चाणक्य काहीसा अपयशीही ठरला, पण आता नव्या जोमाने तो 'घरवापसी'साठी सज्ज असल्याचं कळतंय.
गेल्या काही महिन्यात प्रशांत किशोर आणि पंतप्रधान मोदी यांची अनेकदा भेट झालीय. या भेटी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालल्याचं पक्षातील खास व्यक्तीनं सांगितलं. या बैठकांमध्ये, येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी झाल्याचं समजतं. इतकंच नव्हे तर, अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यातील मतभेदही मिटल्याची चिन्हं आहेत. कारण, या दोघांच्याही बऱ्याच बैठका झाल्याचं सांगितलं जातंय. तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी पूर्ण ताकद लावल्यास विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी सूचना प्रशांत किशोर यांनी केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.
दुसरीकडे, प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संघटनेनं तरुणांची भरती सुरू केली आहे. #NationalAgendaForum हा हॅशटॅग प्रत्येक ट्विटसोबत जोडला जातोय. महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेऊन ते तरुणांना जोडण्याची मोहीम राबवत ठळकपणे जाणवतंय. त्यातून प्रशांत किशोर यांची चलाखी सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळेच मोदी-शहा थोडे निश्चिंत होणार आहेत.