नवी दिल्ली - आज सकाळपासूनच लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. देशाची राजधानी दिल्लीत ७ जगासाठी मतदान होत आहे. दिल्लीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सर्वसामान्य लोकांपासून प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा मतदानासाठी रांगेत उभे आहेत. दरम्यान, देशाचे पहिले नागरिक अर्थात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही रांगेत उभा राहून मतदान केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी राष्ट्रपती भवन परिसरातील राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालय येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित होत्या. लोकशाहीत सर्वात मोठी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, देशाचे पहिले नागरिक समजले जाणारे राष्ट्रपती आणि सर्वसामन्य व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार एक समान आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी लवकर येऊन रांगेत उभा राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
तसे पहिले तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कानपूर येथील रह्वासी आहेत. मात्र, ते राष्ट्रपती असल्यामुळे त्यांचे मतदान राष्ट्रपती भवन परिसरात होते. मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती आणि फोटो 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या ट्विटर पेजवर पोस्ट करण्यात आली आहे.
दिल्लीत होत असलेल्या मतदानावेळी, क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी ही मतदानाचा हक्क बजावला.