नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील प्रचारादरम्यान काँग्रेसला पाठींबा देण्यावरुन द्रमुकवर निशाणा साधला आहे.
डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावाला पाठींबा दिला. मात्र, त्यांच्या या भुमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर पक्षांचा विरोध आहे. कारण, या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत असे नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये शनिवारी (13 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधी जालियनवाला बाग हत्याकांडच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसेच तामिळनाडूतील दिग्गज आणि दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. देशाला अशा नेत्यांवर गर्व आहे. ज्यांनी गरिबांसाठी काम केलं असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकूभ्रष्टाचारी विरोधकांना आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. ते सध्या बेलवर आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही त्यांना जेलमध्ये (तुरुंगात) पोहोचवू, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावर याआधी टीका केली होती. काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार असे सांगत, त्यांनी काँग्रेसने गरिबांच्या पैशाची लूट सुरू झाल्याची टीकाही केली होती. जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या धाडींमध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे गुपित सांगितले. प्राप्तिकर खात्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या सहकाऱ्याकडे टाकलेल्या धाडींमध्ये मोठी रक्कम जप्त केल्याचे वृत्त आहे. राज्याची सत्ता कॉँग्रेसला मिळून सहा महिनेच झाले असताना, त्यांनी जनतेच्या पैशांची लूट सुरू केली आहे. यापूर्वी कर्नाटक हे काँग्रेसचे एटीएम होते. आता त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची भर पडली आहे. आम्ही पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे काँग्रेसला पोटशूळ का उठला, असा सवाल करून मोदी म्हणाले की, जो पक्ष त्याचे पुरावे मागतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणार का? दहा वर्षे देशात रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार होते. त्यामुळे त्यांना काही करता आले नाही. तुम्हाला जे करता आले नाही, ते जर कोणी करीत असेल तर त्यांना का थांबविता? असा सवाल त्यांनी केला होता.