मुंबई - राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातील मतदारांना भाजप पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. राहुल यांच्याबद्दल चुकीचा प्रचार सुद्धा भाजपचे काही लोक करत असल्याचे ही प्रियंका म्हणाल्या. गांधी कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा अमेठी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रियंका सांभाळत आहेत.
अमेठी लोकसभा मतदार संघामधील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी २० हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. २० हजार रुपयात सरपंच विकतील असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.
२०१४ प्रमाणे यावेळी ही अमेठी मधून राहुल गांधीच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवले आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असललेल्या अमेठी लोकसभा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दुसरीकडे, भाजपच्या प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न प्रियंका आणि राहुल करत असल्याचे पहायला मिळत आहे.
काँग्रेस प्रमाणे भाजपला सुद्धा अमेठी लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा बनला आहे. गांधी घराण्याचा ताब्यात असलेला हा मतदार संघ काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. अमेठीतून भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पुन्हा आव्हान दिलं असून त्यांना कितपत यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल