प्रियंका गांधींनी मोकाट जनावरांचा उल्लेख करताच; गर्दीतून योगी-मोदींचा घोष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:46 PM2019-05-11T17:46:23+5:302019-05-11T19:50:38+5:30
प्रियंका म्हणाल्या की, शेतकऱ्यांवर संकटे आली. अनेकदा शेतीचे नुकसान झाले. तर कधी मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस झाली. मात्र विम्याचा एक पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक प्रचारात टीकेची पातळी खालावल्याचे दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका टीप्पणी करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या महासचिव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मात्र यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात आयोजित एका प्रचारसभेत प्रियंका बोलत होत्या.
प्रियंका म्हणाल्या की, शेतकऱ्यांवर संकटे आली. अनेकदा शेतीचे नुकसान झाले. तर कधी मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस झाली. मात्र विम्याचा एक पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही. गावात जावून मोदी शेतकऱ्यांना भेटले असते तर त्यांना वास्तव कळलं असतं. गावांना भेटी दिल्या असत्या तर गावांमध्ये मोकाट जनावरांना काय म्हणतात हे तरी मोदींना कळले असते, असंही प्रियंका म्हणाल्या.
यावेळी प्रियंका यांनी भाषणात जमलेल्या गर्दीला विचारले की, तुमच्याकडे मोकाट जनावरांना काय म्हणतात, त्यावेळी गर्दीतून मोदी आणि योगीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ बंगल्यात राहतात. केवळ प्रचार सभांमध्ये मोठमोठी भाषणे देतात. परंतु, लोकांना भेटून त्यांच्या समस्या विचारत नाहीत. पंतप्रधानांची जनतेशी असलेली नाळ तुटल्याचे टीका प्रियंका यांनी यावेळी केली.
याआधी लागले होते 'चौकीदार चोर'चे नारे
अमेठी येथे प्रियंका यांच्या कार्यक्रमात 'चौकीदार चोर'चे नारे लागले होते. लहान मुलांनी त्यावेळी हे नारे दिले होते. त्यानंतर यावरून वाद झाला होता. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच या संदर्भातील व्हिडिओ इराणी यांनी ट्विट केला होता.