नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी दोन दिवसांपासून प्रचारासाठी रायबरेली आणि अमेठीमध्ये आहे. या दौऱ्यात प्रियंका बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतली.
बुधवारी उशिरा रात्री प्रियंका अमेठीत दाखल झाल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची लाडूने तुला करण्याचं ठरवलं होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठे तराजू आणि लाडू आणले गेले होते. लाडूतुला झाल्यानंतर हे लाडू गरिबांमध्ये वाटप करण्यात येणार होते. यावेळी सर्वांनी प्रियंका यांना तराजूमध्ये बसण्याची विनंती केली. त्यावर तराजूला पाहताच कार्यकर्त्यांना उद्देशून प्रियंका गंमतीने म्हणाल्या की, मी काय तुम्हाला एक क्विंटल पेक्षा अधिक वजनाची वाटते का, हे एकूण उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. यावेळी तुला करण्यासाठीची कार्यकर्त्यांची विनंती प्रियंका गांधी यांनी नाकारली आणि तेथील स्थानिक नेत्याची तुला करून लाडू गरिबांना वाटण्यात आले.
प्रियंका यांनी बुधवारी अमेठीतील गौरीगंजमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. तसेच निवडणुकीची तयारी कशी चालू आहे, हे देखील विचारले. त्यावर कार्यकर्त्यांनी २०१९ ची तयारी जोरात सुरू असलेल्या म्हटले. परंतु, प्रियंका यांनी कार्यकर्त्याला उद्देशून आपण २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीविषयी बोलत असल्याचे म्हटले. यावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची देखील तयारी सुरू केल्याचे दिसून येते. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
या दौऱ्यात प्रियंका यांना निवडणूक लढवणार का, असंही विचारण्यात आले. त्यावर पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणुकीच्या मैदानात उतरू असे सांगितले. तसेच आगामी लोकसभा निवडणूक ही देश वाचविण्यासाठीची निवडणूक असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.