मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच, राजकीय नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोट बंदीच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदी करताना नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते असा दावा राहुल गांधींनी केला आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील सभेत ते बोलत होते.
नोट बंदीचा एवढा मोठा निर्णय घेत असताना मोदींनी कोणालाच विचारले नाही. नोट बंदीचा निर्णय घेताना मंत्रिमंडळाला खोलीत डांबून ठेवले होते. असा, आरोप राहुल यांनी मोदींवर केला. गेल्या ७० वर्षापासून देश चालवत असलेल्या आरबीआयला सुद्धा त्यांनी विचारले नाही, असे राहुल म्हणाले. मला ही सर्व माहिती एसपीजी कमांडोंनी दिली असल्याच्या दावा राहुल यांनी केला.
मोदी यांच्या रडार वक्तव्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. त्यांना रडारवरून प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र आंबा कसा खातात हे विचारले जाते, असे म्हणत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली.