मुंबई - काँग्रेसच्या वतीने आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास काँग्रेस काय करणार, यावर आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने जाहीरनाम्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिदुत्वाला रोजगार देण्याचे आश्वासन देऊन प्रत्युत्तर दिले आहे.
वर्ध्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आवळला होता. तसेच हिंदू आंतकवादी हा शब्द काँग्रेसने पहिल्यांदा उच्चारल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे २०१४ मध्ये विकासाच्या मुद्दावर निवडणुकीला सामोरा जाणारा भाजप अचानक हिंदुत्वावर कसा परतला, असे प्रश्न राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये उपस्थित होत आहेत. त्याला राहुल यांनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिंदुत्वावर काँग्रेसचे उत्तर काय असेल, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर राहुल यांनी देशात सर्वच हिंदू असल्याचे सांगत हिंदुंना रोजगाराची गरज असल्याचे म्हटले. तसेच शेतकऱ्यांना मदतीची गरज असून महिलांना सुरक्षा आणि आरक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, या मुद्दांवर पंतप्रधान मोदींनी मौन धारण केल्याचे राहुल यांनी सांगितले.
दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्दावर काँग्रेस मागे राहणार नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये काँग्रेस म्हणजे हिंदुविरोधी पक्ष असल्याची प्रतिमा तयार झाली होती. याचा परिणाम काँग्रेसला निवडणुकीत भोगावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.