नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, असे केल्याने दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील असे ते म्हणाले. शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वबाबत आपला विश्वास व्यक्त केला आणि राहुल गांधी यांना या पदावर राहण्याची विनंती केली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याविषयी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, सदस्यांनी सर्वमताने त्यांच्या राजीनामा देण्याचा आग्रह नाकारण्यात आला आहे. तसेच, राहुल यांच्या नेतृत्वाची कॉंग्रेसला आवश्यकता आहे, आणि पुढे चालू ठेवण्याची विनंती केली असल्याचे आझाद म्हणाले. जर, एखादा नेता राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतो तर ते राहुल गांधी आहे. असा दावा सुद्धा गुलाम नबी आझाद यांनी केला. दुसरीकडे याच बैठकीत, राहुल गांधींनी राजीनामे देऊ नये अन्यथा काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील असे पी. चिदंबरम यांनी म्हंटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कॉंग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितले.