नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढविणार आहे. केरळ काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी शनिवारी असा दावा केला आहे. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तयार असल्याचा दावा रामचंद्रन यांनी केला आहे.
राहुल गांधी सध्या अमेठी मतदार संघातून खासदार आहेत. अमेठीतून राहुल यांच्यासमोर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान असणार आहे. राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी यासाठी एक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. सुरुवातीला राहुल गांधी तयार नव्हते, परंतु अखेर तयार झाल्याचे रामचंद्रन यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते ओमान चंडी यांनी म्हटले की, केरळ काँग्रेस कमिटीने राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. यावर राहुल यांचे कधीही उत्तर येऊ शकते, असंही ते म्हणाले. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदार संघात कन्नूर, मलाप्पूरम आणि वायनाडचा समावेश असून २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे.