मुंबई - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपप्रणीत एनडीएविरुद्ध एल्गार पुकारला असताना त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रात एनडीएला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निकालावरून राज ठाकरे फॅक्टर फारसा प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा फॅक्टर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. मात्र आतापर्यंत आलेल्या निकालात आघाडीला पुन्हा अपयशच आले आहे. भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना गर्दी देखील झाली. मात्र त्यांच्या सभांची गर्दी यावेळी देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा फॅक्टर उपयोगी ठरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर भाजपसाठी परिणामकारक ठरला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादींची मते विभागण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात भाजप २२, शिवसेना १९, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर आहे.