नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असून अर्ध्यापेक्षा अधिक लढाई पार पडली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील सामील झाले आहे. राजनाथ यांनी दावा केला की, भाजपला २०१४ पेक्षा यावेळी अधिक जागा मिळतील. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.
देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे भाजपला २०१४ पेक्षा अधिक जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळतील.
भाजपसाठी तीन मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये अंत्योदय, दुसरा देशाचा विकास आणि तिसरा म्हणजे देशाची सुरक्षा. या तीनही आघाड्यांवर भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. याचा परिणाम ग्राउंड लेव्हलला दिसून येत, असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. पंतप्रधानपदाचा तुमचा उमेदवार कोण, असा सवाल राजनाथ यांनी विरोधकांना केला. लोकशाहीत मतदारांना अंधारात ठेवणे योग्य नसल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, पूर्वीच्या युपीए आणि आताच्या एनडीए सरकारच्या कामाची तुलना केल्यास फरक स्पष्ट दिसून येतो.