कॉंग्रेसच्या राफेल वर मोदींच एयर स्ट्राइक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:57 PM2019-05-23T12:57:06+5:302019-05-23T12:57:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करत राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्त या मुद्यावर जोर दिला.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे कल ज्याप्रमाणे दिसत आहे, त्यातून एनडीएच सरकार पुन्हा येणार असे अंदाज वर्तवले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राफेल घोटाळ्यावरून घेरले होते. तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत एयर स्ट्राइकवरून मते मागत होते.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे राफेल वरुन मोदींना चारही बाजूने घेरत असल्याचे चित्र पहायला मिळाले. चौकीदार चोर है ही घोषणा अगदी खेडोपाड्यापर्यंत गेली होती. अगदी शेवटपर्यंत राहुल आणि त्यांच्या कॉंग्रेसचा नेत्यांनी मोदींवर राफेल वरून निशाना साधला. २०१४ मध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून कॉंग्रेसला सत्ता गमावण्याची वेळ आली, तोच भ्रष्टाचाराचा मुद्दा २०१९ मध्ये राफेलच्या माध्यमातूनच कॉंग्रेसने समोर आणला. मात्र आलेल्या निकालाचा विचार करता कॉंग्रेसला त्यात यश मिळू शकले नाही.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करत राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्त या मुद्यावर जोर दिला. पाकिस्तानवर केलेल्या एयर स्ट्राइकचा श्रेय घेण्याची कोणतेही संधी मोदींनी सोडली नाही. आपल्या सभेतून त्यांनी थेट जवानांच्या नावावरून मत माघीतले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे राहुल यांच्या राफेलपेक्षा मोदींच्या एयर स्ट्राइकला यशस्वी ठरले असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही.