नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्वच्या सर्व सातही टप्पे पार पडले आहे. त्यानंतर लगेचच विविध संस्थांचे पूर्वानुमान अर्थात एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. तर विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवकाँग्रेसला पाठिंबा देण्यासंदर्भात अनुकुलता दर्शविली आहे. काँग्रेसला गरज भासल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गरिबांना, शेतकऱ्यांना, देशाला आणि देशात एकता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले देशातील पक्ष २३ मे नंतर देशाला नवीन पंतप्रधान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू सर्वांच्या भेटी घेत आहेत. गरज भासल्यास आपण काँग्रेसला देखील पाठिंबा देऊ, असं सांगताना उत्तर प्रदेशात महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा अखिलेश यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. दिल्लीत जावून मायावती काँग्रेस नेत्यांशी चर्चा करतील. मायावती यांचा दिल्ली दौरा आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दुसरीकडे चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, युपीए प्रमुख सोनिया गांधी, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी देखील चर्चा केली. एकेकाळी एनडीएचे घटक असलेले नायडू मोदींविरोधात रिंगणात उतरले आहेत.