नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची फलंदाजी क्रिकेटच्या मैदानात चांगलीच रंगायची. पण आता त्याची ‘बोलंदाजी’ही रंजकहोत असल्याचे दिसत आहे. पूर्व दिल्लीतून गंभीर लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिला आहे. आतापर्यंत निकाल लागला नसला तरी गंभीरकडे चांगलीच आघाडी आहे. त्यामुळेच गंभीरने फक्त एका ट्विटमध्येच या दोघांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली आणि आम आदमी पार्टीच्या आतिषी यांच्यावर क्रिकेटमधील काही शब्द वापरत खरमरीत टीका केली आहे. गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, “ ‘लवली’ कव्हर ड्राइव्ह नाही किंवा ‘आतिषी’ फलंदाजी नाही, तर हा भाजपाच्या ‘गंभीर’ विचारसरणीला लोकांनी दिलेला पाठिंबा आहे.“
2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. त्याला पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 07.30 वाजेपर्यंत 6 लाख 95 हजार 109 मतांसह विजयाच्या दिशेने कूच केली आहे. त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली यांना 3 लाख 04 हजार 718 मतं मिळवली, तर आम आदमी पार्टीच्या आतिषी यांना 2 लाख 19 हजार 156 मतं मिळवली.