नवी दिल्ली : लोकसभा निडवणुकीत उभे राहिलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व ऑलिम्पिकपटू नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी विजय मिळवला आहे. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद, बॉक्सर विजेंदर सिंग आणि थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेल्या खेळाडूंच्या पदरी पराभव पडला आहे.
2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. त्याला पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 6 लाख 96 हजार 156 मतांसह विजय मिळवला आहे. त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली यांनी 3 लाख 04 हजार 934 मतं मिळवली, तर आम आदमी पार्टीच्या आतिषी यांना 2 लाख 19 हजार 328 मतं मिळाली.
दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगला कसेबसे तिसरे स्थान पटकावता आलेले पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपाच्या रमेश बिधुरी यांनी 6 लाख 87 हजार 014 मतं मिळवली आहेत. आम आदमी पार्टीचे राघव चढा ( 3,19, 971) दुसऱ्या, तर विजेंदर ( 1, 64, 613) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत विजेंदरने कांस्यपदक जिंकले होते. लोकसभा निडवणूकीत लढण्यासाठी विजेंदरने हरयाणा पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा दिला होता.
राजस्थानमधील जयपूर ग्रामीण मतदारसंघात दोन ऑलिम्पिकपटूंमध्ये स्पर्धा होती. सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री आणि 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नेमबाज राज्यवर्धन राठोड याच्यासमोर काँग्रेसच्या तिकीटावर उभी असलेली कृष्णा पुनियाने आव्हान उभे केले आहे. पूनियाने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेकीत सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय तीने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. राज्यवर्धन यांनी 2002 आणि 2006च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 25 पदकांची कमाई केली आहे. पुनियाला 2011मध्ये पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पण, राजकारणाच्या रिंगणात पुनियाला अपयश आलेले पाहायला मिळत आहे. राठोड यांनी 8 लाख 20 हजार 132 मतांसह मोठा विजय मिळवला आहे, पुनियाला 4 लाख 26 हजार 961 मतं मिळवता आली.
भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी भाजपाची साथ सोडून यंदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड येथील धनबाद मतदार संघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. आझाद हे 1983च्या वर्ल्ड कप संघातील सदस्य होते. आझाद यांना पराभव पत्करावा लागला असून ते या मतदार संघात 3 लाख 41 हजार 040 मतं मिळवली आहेत. या मतदार संघात भाजपाच्या पशुपथी नाथ सिंग यांनी विजय मिळवला असून त्यांना 8 लाख 27 हजार 234 मतं मिळाली आहेत.