नवी दिल्ली - अभिनेत्री रिचा चढ्ढा सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावरून रिचाने अनेकदा ट्रोलिंगला न घाबरता आपले मत व्यक्त केले आहे. सध्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. त्यात रिचा पॉलिटीकली सक्रीय झाली असून रिचाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या 'टाईम' मासिकाचे कव्हरपेज शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लागवला आहे.
टाईमच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आले आहे. वास्तविक पाहता, टाईमच्या कव्हरपेजवर झळकणे अभिमानास्पद बाब समजली जाते. याआधी मोदींना टाईमच्या कव्हरपेजवर स्थान मिळालेले आहे. यावेळी मात्र टाईमकडून नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कामावर टीका करण्यात आली आहे. तसेच 'डीव्हाडर इन चिफ' अर्थात विभाजनाचा प्रमुख अशा शब्दांत मोदींवर ताशेरे ओढण्यात आले आहे. हाच धागा पकडून रिचा चढ्ढाने मोदींवर निशाना साधला.
रिचाने टाईमचं कव्हरपेज शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्ही परदेशी माध्यमे खरेदी करू शकत नाही तेव्हा असच होत. रिचाने आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या भारतीय माध्यमांना देखील टोला लगावला आहे. रिचाचा या ट्विटला प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी रिट्विट केले आहे.
दुसरीकडे मोदींवर टाईममध्ये आर्टीकल लिहिणारे पत्रकार आतिश तासीर चर्चेत आले आहे. मागील पाच वर्षांत मोदींनी भारतात विभाजन केल्याचं आर्टिकलमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आतिश तासीर यांच्यावर देखील टीका होत आहे. आतीश तासीर यांची आई भारतीय असून वडील पाकिस्तानी उद्योजक होते. २०११ मध्ये वडिलांची हत्या झाल्यानंतर तासीर यांनी पाकिस्तानच्या स्थितीवर देखील आर्टिकल लिहिले होते.