नवी दिल्ली - देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी लोकसभेचे उमेदवार देखील जाहीर केले आहे. त्यात आता बहिण प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता अभिनेता संजय दत्त देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेता संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. संजय दत्त यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहामुळे संजय यांनी 'सपा'मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु संजय दत्त त्यावेळी निवडणूक लढवू शकले नाही. संजय दत्त यांचे कुटुंबीय काँग्रेसीचे आहेत. बहिण प्रिंया दत्त यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
दरम्यान 'सपा'मधून अमरसिंह बाहेर झाल्यानंतर संजय दत्त यांनी देखील पक्षापासून स्वत:ला वेगळे केले होते. आता पुन्हा एकदा संजय दत्त निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त आले आहे. सपा त्यांना गाझियाबादमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाला गाझियाबादमध्ये केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध आहे. याआधी शत्रुघ्न सिन्हा यांना गाझियाबादमधून तिकीट देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.