नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बीग बॉस फेम सपना चौधरी हिने शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिने उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटक नरेंद्र राठी यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे.
काँग्रेसकडूनच सपना चौधरी यांच्या मथुरेतील उमेदवारीवर पूर्णविराम देण्यात आला आहे. या मतदार संघात काँग्रेसकडून महेश पाठक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर भाजपने येथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस प्रवेशापूर्वी सपना चौधरीने 'युपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तसेच काँग्रेससाठी निवडणुकीचा प्रचार करण्याचे ठरवले होते. त्यानंतर शनिवारी सपना हिने प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. सपना हरियाणा व्यतिरिक्त इतर राज्यांत देखील प्रसिद्ध आहे. तसेच तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. या आधारावरच काँग्रेस सपनाला उमेदवारी देईल अशी चर्चा होती. आता सपना निवडणूक लढविणार नसल्याच्या वृत्ताने तिचे चाहते नक्कीच नाराज होणार आहे.
मथुरेत दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी २६ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तर १८ एप्रिलला मतदान होणार आहे.