महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग; 'या' नेत्याने शरद पवारांचा फोन घेणे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:53 PM2019-05-21T14:53:37+5:302019-05-21T14:55:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आले आहे. असं असले तरी विरोधकांनी मात्र निवडणूक निकालापूर्वी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर शरद पवारही अनेक नेत्यांशी संपर्क साधत आहे. मात्र निकालापूर्वी सुरू असलेल्या महाआघाडीच्या मोर्चेबांधणीला सध्या तरी यश येत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. यावरून निकालापूर्वी मोर्चेबांधणीसाठी सध्या तरी महाआघाडीला यश येत नसल्याचे दिसून आले.
एक्झिट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत आंध्रप्रदेशात शानदार कामगिरी करणारे जगन मोहन रेड्डी निकालापूर्वी कोणत्याही पक्षासोबत जाण्यास इच्छूक नाही. निकालानंतर आपण चर्चा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. गेल्या आठवड्यात चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. मात्र नायडू आणि रेड्डी एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत. त्यात रेड्डी आणि काँग्रेस यांच्यात देखील वितुष्ट आहे. त्यामुळेच रेड्डी यांनी पवारांचा फोन उचलला नसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर आणि आंध्रप्रदेशचे नेते जगन मोहन रेड्डी यांची समजूत काढून त्यांना युपीएमध्ये आणण्याची जबाबदारी काँग्रेसने शरद पवार यांच्याकडे सोपविली आहे. जगन मोहन यांचे वडील, केसीआर आणि पवार यांच्यात पूर्वी चांगले संबंध होते. तर जगन मोहन, केसीआर आणि काँग्रेस यांच्यात ३६ चा आकडा आहे. त्यामुळे काँग्रेसने ही जबाबदारी पवारांवर सोपविली होती. मात्र पवारांच्या प्रयत्नांना सुरंग लागला आहे.