नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएतील घटक पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून अनेक राज्यांत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. परंतु निवडणूक प्रचारात एनडीएमधील घटक पक्षांनी आपापल्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या धडाक्यात 'मै भी चौकीदार' मोहिम सुरू केली. 'मै भी चौकीदार' मोहिम लॉन्च केल्यानंतर मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावरील नावाच्या पूर्वी चौकीदार लावले आहे. ही मोहिम सोशल मीडियावर हॅशटॅग #MainBhiChowkidar ट्रेंडमध्ये आली होती. ट्विटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांत ट्विटरवर #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा तब्बल १५ लाख वेळा वापर झाला होता. या व्यतिरिक्त भाजपकडून #ChowkidarPhirSe हा हॅशटॅग देखील चालविण्यात आला होता. परंतु यात मित्रपक्षाचे कोणीही सामील होताना दिसले नाही.
दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडिया हॅंडलचे नाव चौकीदार केले. परंतु मित्रपक्ष या मोहिमेत कुठेही दिसले नाही. केवळ भाजपच्या नेत्यांनी आपले नाव बदलले असून महाराष्ट्रीतील अनेक नेत्यांनी अद्याप या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलेला दिसत नाहीत. तर शिवसेनेच्या देखील एकाही नेत्याने चौकीदार मोहिमेला पाठिंबा दिसला नाही. तर बिहारमध्ये देखील नितीश कुमार या मोहिमेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे मित्रपक्ष मोहिमेपासून दूर ?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है'च्या प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार' मोहिम सुरू केल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे मित्र पक्षाला 'मै भी चौकीदार' म्हणायची गरज पडली नसेल, किंवा मित्रपक्षांना पुन्हा मोदी पंतप्रधान नकोय, अशी शक्यता ही व्यक्त होत आहे.