नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी कायमच वादात राहिली. पाच वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून मोठा वाद झाला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं होतं. पण आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळी माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत पदवीचा वाद संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बीकॉमची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. मात्र तीन वर्षांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं नाही, अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रातून दिली आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण न केल्याची माहिती खुद्द इराणी यांनी दिल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इराणी यांनी 2004 आणि 2014 मध्ये निवडणूक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर शिक्षणावर टीका झाली होती.
2004 मध्ये इराणी यांनी चांदणीचौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळो आपण बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली होती. दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून आपण बीए केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं होतं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.
2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी वेगळीच माहिती दिली. आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीकॉम पार्ट-1 चं शिक्षण घेतल्याची माहिती इराणी यांनी दिली होती. मात्र आता इराणी यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
येल विद्यापीठाची पदवी?केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर स्मृती इराणी यांच्यावर अशिक्षित म्हणून टीका झाली होती. यावेळी त्यांनी या टीकेला प्रत्यूत्तर देताना आपण येल विद्यापीठातून पदवीधर असल्याचे सांगितले होते. तसेच येल विद्यापीठाने आपल्यातील नेतृत्वगुण कसे हेरले होते, याचे पुरावेही दाखवू शकते असेही त्यांनी म्हटले होते.