भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:34 PM2019-05-12T12:34:06+5:302019-05-12T12:35:37+5:30
सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमधील जुगलबंदी सुरूच आहे. पंजाबमधून भारतीय जनता पक्षाने बॉलिवूड अभिनेता सनी देओल याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आता सनी देओल यांच्या उमेदवारीविषयी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी धक्कादायक दावा केला आहे.
सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे. तसेच अभिनेता सनी देओलला येथील जनतेचे काही घेणे-देणे नसून लोकसभा निवडणुकीनंतर तो मुंबईला पळून जाईल, असंही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
काँग्रेसकडून गुरुदासपूरमधून सुनील जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओलला येथील समस्या ठावूक नाही, त्यामुळे येथील जनतेची तो कशी सेवा करू शकले असा सवाल करताना अमरिंदर सिंग यांनी येथील स्थानिक असलेल्या जाखड यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सनी देओल यांच्यावर बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. यातून सनी देओल यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपने दबाव टाकला असेल असा अंदाज अमरिंदर सिंग यांनी बांधला. तसेच दबाला बळी पडूनच सनी देओल यांनी निवडणूक लढविण्यासाठी होकार दर्शविला असंही अमरिंदर सिंग यांनी नमूद केले.