नवी दिल्ली - मुंबईतील २६/११ अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्या संदर्भात प्रज्ञा सिंहने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यमुळे सुरू असलेला गदारोळ अद्याप कायम आहे. प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता लेफ्टनंट जनरल (रियायर्ड) डी.एस. हुड्डा यांनी म्हटले की, एखाद्या शहीद अधिकाऱ्यांविषयी असं वक्तव्य ऐकल्यावर दुख: होते. मग ते शहीद पोलिस अधिकारी असो वा सैन्यातील अधिकारी, असंही हुड्ड यांनी म्हटले आहे. हुड्डा यांच्या नेतृत्वातच २०१६ भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.
प्रज्ञा सिंहने म्हटले होते की, २६/११ अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना आपणच शाप दिला दिला होता. मी त्यांना म्हटले होते की, तुझा सर्वनाश होईल. करकरें यांनी आपल्याला खूप यातना दिल्याचा दावा प्रज्ञा सिंहने आधीच केला होता. २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रज्ञा सिंह आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणाची चौकशी हेमंत करकरे यांनी केली होती. मात्र मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते.
दरम्यान या करकरे यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी राममंदिरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.