नवी दिल्ली - 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांविरुद्ध राण पेटविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमच्या मुद्दावरून यूटर्न घेतला आहे. तसेच वंदे मातरम म्हणण्यासाठी किंवा वंदे मातरम सुरू असताना उभे राहावे, यासाठी कोणताही आग्रह नसल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी स्पष्ट केले. जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांच्यासोबत भाजपची बिहारमध्ये युती आहे. नितीश कुमारांसाठीच भाजपने वंद मातरमच्या नाऱ्याला आता बगल दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून भाजपच सर्वकाही सत्तेसाठीच का, अशी भावना व्यक्त होत आहे.
सुशील कुमार म्हणाले की, भाजप आणि जदयू नैसर्गिक साथीदार आहेत. मात्र दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी असल्याचे मोदींच्या लक्षात आणून दिले. त्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्यासाठी कोणत्याही विचारधारेची गरज नसते, असंही ते म्हणाले. यावेळी वंदे मातरमच्या मुद्दावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान मोदी वंदे मातरमच्या घोषणा देत असताना नितीश कुमार जागेवरून उठले नव्हते, यावर भाजप गप्प का, असं सुशील कुमार मोदी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, हा काही मुद्दा नाही. अनेकदा वंदे मातरम सुरू असताना मी देखील उभा राहात नाही. वंदे मातरमसाठी कुणावरही बंधन नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. मात्र अनेक सभांमध्ये भाजपकडून वंदे मातरमच्या मुद्दावर राजकारण करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यावेळी मोदींनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. तेव्हा सर्व नेते उभे राहिले होते. मात्र जदयूचे नेते नितीश कुमार आपल्या जागेवर बसून होते. एकप्रकारे नितीश यांनी वंद मातरमच्या घोषणेपासून स्वत:ला वेगळे केले होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. भारतीय जनता पक्ष सध्या राष्ट्रवादाच्या मुद्दावर निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातच वंदे मातरमचा मुद्दा भाजपकडून रेटण्यात आला होता.