नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता इव्हीएममध्ये आफरातफरीचे आरोप सुरू झाले आहेत. यावरून विरोधकांमध्ये चर्चा झडत आहेत. या वादात सर्वच आपली प्रतिक्रिया देत असताना बॉलिवूड सेलिब्रेटी देखील चर्चेत सामील होताना दिसत आहे. सोशल मीडियावर सतत एक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने देखील इव्हीएमच्या वादात उडी घेतली आहे.
स्वरा भास्करने ट्विट करून इव्हीएममधील गोंधळावर आपले मत मांडले. इव्हीएममध्ये आफरातफर झाली असेल किंवा ते बदलण्यात आल्याचे वृत्त खरे असेल तर विरोधी पक्ष न्यायालयात का जात नाही, असा सवाल स्वराने उपस्थित केला. तसेच न्यायालयात जाण्याव्यतिरिक्त आणखी काही करता येईल का याची मीमांसा विरोधकांनी करावी, असा सल्ला देखील स्वराने दिला.
अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच सामाजिक मुद्दांवर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असते. अनेकदा स्वराला ट्रोलींगला सामोरे जावे लागते. मात्र स्वरा त्या ट्रोलला सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसते. याआधी चंदोली, गाजीपूर आणि इतर जागांवरील इव्हीएम बदलण्यात आल्याच्या मुद्दावर देखील स्वराने आपले मत व्यक्त केले होते.