नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये पाठवण्यामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. नितीश कुमार व भाजप यांच्यावर तेजस्वी यांनी जोरदार निशाणा साधला. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हे आरोप केले आहे.
लालू प्रसाद यादव यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते जेलमधून बाहेर येऊ शकत नाहीत. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. मात्र बाहेर येण्यासाठी ते सारखे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास कधीच यश येणार नाही. असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा येथे केले होते. यावरूनच तेजस्वी यादव यांनी नितेश कुमार आणि भाजप आपल्या वडीलांना जेलमध्ये पाठवण्यासाठी जवाबदार असल्याचे आरोप केले आहे.
नितीश कुमार व भाजपच्या नेत्यांनी मिळून लालू प्रसाद यांना जेलमध्ये पाठवले आहे. आम्ही यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबतीत जो निर्णय होईल तो नितीश कुमार किंवा नरेंद्र मोदी यांचा नसेल तर तो न्यायालयाचा असेल. तसेच २०१५ मध्ये नितेश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचे कश्यासाठी पाय धरले होते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.
बिहारमध्ये सातव्या टप्प्यात एकूण ८ लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी बिहार मधील राजकीय वातावरण तापत आहे. लोकसभा निवडणुकात राजद व काँग्रेस बरोबर अन्य लहान पक्ष एकत्र आहेत. नितीश व भाजप दुसऱ्या बाजूला आहेत. तीन वर्षांपूर्वी भाजपला पराभूत करणारा लालू प्रसादांचा राष्ट्रीय म्हणवणारा प्रादेशिक पक्ष ते तुरुंगात असताना यंदा कितपत प्रभाव पाडतो, हे पाहायला हवे.