नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून संपूर्ण देशात निवडणुकीचे वारं वाहू लागलंय. देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र अल्पसंख्याकाच्या रमजान महिन्यात मतदानाची तारीख येणार असल्याने यावर प्रश्न उपस्थित राहू लागलेत.
रमजानचा रोजा सुरु होणाऱ्या असल्याने मतदान टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो. ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होईल. याचा फटका सर्वाधित उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीच्या काही भागात पडू शकतो. ५४३ लोकसभा जागांपैकी १६९ जागांवरील मतदान प्रक्रियेत याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी केला आहे.
फिरहाद हकीम म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्ही त्याचा सन्मान राखतो, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही काही भाष्य करू शकत नाही. मात्र निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना रमजान महिन्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणं गरजेचे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्ष्यणीय आहे. रमजानचा रोजा ठेऊन मुस्लिम मतदारांना मतदान करणे शक्य होणार नाही. अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप त्यांनी केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रमजान महिन्यात होणाऱ्या मतदान तारखा बदलण्याची मागणी केली.