मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षांतर आणि पक्षप्रवेशाचे सोहळे रंगताना दिसत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत संपली आहे. परंतु, निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतील मतदानासाठी अजुनही पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव जोडले गेले आहे. उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
याआधी अभिनेता गोविंदा याने देखील काँग्रेसकडून मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे दिग्गज राम नाईक यांना पराभूत केले होते. आता उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतानाच ती देखील गोविंदा सराखी विजयी सुरुवात करणार का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आहे.
राजकारण आणि सिने कलाकारांचा संबंध बऱ्याच वर्षांपासून चालत आला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. यापैकी अनेकांनी बॉलिवूडसोडल्यानंतर अखेरच्या श्वासपर्यंत राजकारण सोडले नाही. तर अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचे मन राजकारणात अधिक काळ रमले नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते गोविंदाचे. अभिनेता गोविंदा याने त्याकाळी भाजपचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा उत्तर मुंबईतून पराभव करत विजयाची नोंद केली होती. मात्र गोविंदाची राजकीय कारकिर्द फारशी बहरली नाही. याउलट संसदेत गैरहजर राहण्यावरूनच त्याच्यावर टीका झाली. उर्मिलाच्या बाबतीत ही असंच होईल का, उर्मिला राजकारणाला पूर्ण वेळ देईल का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. उर्मिलाने आपल्या अभिनयाने बराच काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. आता ती उर्मिला आपल्या राजकीय इनिंगसाठी सज्ज झाली आहे.
मराठमोळ्या उर्मिलाला काँग्रेस उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. असं झाल्यास तिच्यासमोर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान असणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र २००४ मध्ये अभिनेता गोविंदाने याच मतदार संघातून राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर नाईक यांचा २००९ मध्ये संजय निरुपम यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ गोपाळ शेट्टी यांनी भाजपला मिळवून दिला आहे. आता या मतदार संघातील मतदार पुन्हा एकदा शेट्टींना निवडणार की, उर्मिलाला संधी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.