मुंबई - लोकसभा निवडणुकीचे वातवरण आता तापू लागले आहे. उमेदवार आपले मतदारसंघ पिजून काढत आहेत. तिकडे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपल्या प्रचारला सुरवात केली आहे. मतदारसंघात उर्मिला यांनी भावनिक आव्हान करून मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
'आपली मुंबईची मुलगी' असा हॅशटॅग वापरत उर्मिला सोशल मीडियावरून मतदारांना साद घालत आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील भेटीगाठीमध्ये देखील उर्मिला भावनिक आवाहन करताना दिसत आहे. मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. त्यामुळे उर्मिलाचा हॅशटॅग #AapliMumbaichiMulagi याचा फायदा उर्मिला यांना होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
रविवारी उर्मिला यांनी रिक्षा चालकांची भेट घेतली. तसेच रिक्षा चालकाच्या सीटवर बसलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन उर्मिला यांनी केले. बॉलिवूड अभिनेत्री ते लोकसभा उमेदवार असा प्रवास करणारी उर्मिला सध्या जनतेत जाऊन मतदारांना साद घालत आहे. तसेच मतदार संघातील स्थानिक कार्यक्रमात देखील उर्मिला हजेरी लावाताना दिसत आहे.नेहमी चित्रपटात हिंदीत बोलणारी उर्मिला मतदारसंघात लोकांशी मराठीत संवाद साधत आहे. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्य़ा मुंबई उत्तर मतदार संघामधून उर्मिला आपलं नशीब अजमावत आहे. परंतु, मुंबईतील मतदार मराठमोळ्या उर्मिला यांना साथ देणार की, विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना निवडून देणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.