श्रीनगर : सर्व रस्त्यांवर शुकशुकाट आणि मतदान केंद्रांच्या दिशेने जाणारा एखाद-दुसराच मतदार. मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारीही शांतपणे बसलेले. हल्ल्याच्या भीतीने घाबरलेले. अनेक केंद्रांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही मतदार आलेला नाही... काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघात सोमवारी मतदानाच्या ही स्थिती होती.पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या आहे सुमारे सव्वापाच लाख. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ १.८ टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम ८ ते ९ टक्के मतदान झाले होते.रस्त्यांवर मतदार नसले तरी सुरक्षा दलाचे जवान व वाहने मोठ्या प्रमाणात दिसत होती. दहशतवाद्यांच्या भीतीने गावांमधील दुकानेही आज बंदच दिसत होती. काश्मीरमधील पुलवामा व शोपियां या भागांत आजही दहशतवादी सक्रिय असल्याचा हा परिणाम होता. कुपवाडा जिल्ह्यातील काकापोरा या लहान शहरातही हेच दृश्य होते. तिथे एका केंद्रात मतदारांची संख्या १0३९ असून, तिथे दोनच जणांनीच दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केले. अनेक मतदान केंद्रांत एक, दोन वा तीनच मतदार दुपारपर्यंत आले होते.लोकांना घाबरवण्यासाठी सकाळीच समाजकंटकांनी काही भागांत दगडफेक सुरू केली. अनेक घरांच्या काचा फुटल्या. पण त्यामुळे लोक बाहेरच पडले नाहीत.
Lok Sabha Election 2019 : अनंतनाग मतदारसंघामधील मतदान केंद्रे रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:53 AM