मुंबई - भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बाबरी मशिदीसंदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रज्ञा सिंह यांनी दावा केला होता की, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात मी देखील सहभागी झाले होते. प्रज्ञा सिंहच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या वयासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेकांच्या मते बाबरी पाडण्यासमयी प्रज्ञा यांचे वय केवळ ४ होते. याचा सखोल तपास केला असता सत्या काही वेगळंच समोर आले आहे.
प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते की, मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी गेले होते. तसेच वर चढून बाबरीचा ढाचा आपण पाडला. याचा आपल्याला अभिमान आहे. देवाने मला यासाठी बळ दिले होते. मी देशावर लागलेला कलंक मिटवला. आता आयोध्येत राममंदिरही बांधण्यात येईल, असंही प्रज्ञा सिंह यांनी नमूद केले होते.
प्रज्ञा सिंह यांच्या वयावरून गदारोळ
बाबरीविषयीच्या वक्तव्यानंतर प्रज्ञा सिंह यांच्या वयाचा विषय ऐरणीवर आला होता. सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजमध्ये प्रज्ञा सिंह यांची जन्म तारिख २ एप्रिल १९८८ आहे. यानंतर अनेक पत्रकारांनी आणि नेत्यांनी साध्वीचा जन्म १९८८ चा असल्याचे म्हटले होते. यावरून प्रज्ञा सिंह यांचे वय बाबरी पाडण्याच्या वेळी केवळ ४ वर्षे होते, मग बाबरी कसकाय पाडली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान प्रज्ञा सिंह यांच्या वयाची पडताळणी करण्यात आली. २९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा सिंह यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जात प्रज्ञा सिंह यांनी २०१६ मध्ये त्यांच वय ४४ वर्षे नमूद केले होते. यावरून त्यांचा जन्म १९७२ मध्ये झाला होता. जर प्रज्ञा सिंह २०१६ मध्ये ४४ वर्षांच्या होत्या, तर १९९२ मध्ये त्यांचे नक्कीच वय २० असेल, असं दिसून येतं.