नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असून सर्वच राजकीय पक्षांनी या टप्प्यातील प्रचारासाठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सोमवारी रतलाममध्ये सभेला संबोधित केले. मात्र ही सभा वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आली आहे. प्रियंका गांधी यांच्या सेल्फीसाठी काही महिलांनी हट्ट धरला होता. त्यांची मागणी प्रियंका गांधी यांनी अनोख्या पद्धतीने पूर्ण केली.
सभेला संबोधीत केल्यानंतर प्रियंका व्यासपीठावरून खाली उतरत होत्या. त्याचवेळी गर्दीतून आवाज आला प्रियंका दीदी, तो आवाज ऐकताच प्रियंका गांधी थांबल्या आणि तीन फुट उंच बॅरिकेट्स ओलांडून आवाज देणाऱ्या गर्दीत सामील झाल्या. बॅरिकेट्स ओलांडतानाचे पाहून त्यांचे सुरक्षारक्षक देखील आश्चर्यचकीत झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांना देखील बॅरिकेट्स ओलांडून जावं लागलं. त्यानंतर प्रियंका यांनी गर्दीतील महिलांसोबत सेल्फी घेतला.
याआधी प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात रोड शोमध्ये मोदी-मोदीचे नारे देणाऱ्या लोकांशी प्रियंका यांनी हात मिळवला होता. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तत्पूर्वी झालेल्या सभेत प्रियंका यांनी मोदी सरकारच्या कारभारवर कडाडून टीका केली होती. मोदीजी स्वत:ला संन्यासी सांगतात. मात्र त्यांच्याकडून उद्योगपतींचा जप सुरू आहे. लोकशाहीत जनताच सर्वशक्तीमान असते, मात्र मोदी जनतेचा आवाज ऐकत नाही, असा टोलाही प्रियंका यांनी लगावला.