मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतील निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नामनिर्देशन सादर केले आहे. निवडणूक म्हणजे दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सवच. या निवडणुकीत एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ती म्हणजे मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई. या शाईविषयी अनेक गंमतीदार गोष्टी आहोत.
भारत स्वातंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत नव्हती. परंतु, निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.
शाईसाठी घेतली 'एनपीएल'ची मदत
शाई तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यावेळी नॅशनल फिजीकल लॅबोरटरी ऑफ इंडियाला (एनपीएल) एक विशिष्ट प्रकारची शाई बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच ती शाई पाण्याने किंवा कुठल्याही केमिकलने धुतली जाऊ नये, अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर एनपीएलने म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीला तशी शाई बनविण्याची ऑर्डर दिली होती.
शाईचा पहिल्यांदा वापर
१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमिट शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तेव्हापासून ही शाई प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येते. मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्याचा अर्थ असा होतो की, मतदाराने आधी मतदान केले आहे. बोटाला लावलेली ही शाई तब्बल १५ दिवस पुसली जात नाही, हे विशेष.
उन्हात आणखीनच घट्ट होते शाई
निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या शाईचा फॉर्म्युला एनपीएल आणि म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीने गुप्त ठेवला आहे. याचा फॉर्म्युला जाहीर केल्यास ती मिटविण्यासाठी लोक नवीन फॉर्म्युला शोधून काढतील, अशी शका निवडणूक आयोगाला आहे. जाणकारांच्या मते या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळलेले असते. त्यामुळे उन्हात येताच ही शाई आणखी घट्ट होते.
अनेक देशांमध्ये या शाईचा वापर
जगभरात तब्बल २८ देशांमध्ये अमिट शाईचा वापर करण्यात येतो. यामध्ये तुर्की, नायजेरीया, अफगानिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना, कॅनडा, मलेशिया, मालदीव आणि कंबोडीया यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे. कंबोडीया आणि मालदीवमध्ये मतदान केल्यानंतर मतदाराचे बोटच शाईमध्ये बुडविण्यात येते.