मुंबई - गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर भारतातील राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादाची एक लाट आली आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करत आहेत. तसेच सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या नावाने मोदी मतं देखील मागत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार योग्य असल्याचे इमरान खान यांनी म्हटले. तसेच काँग्रेस आल्यास उभय देशांमधील शांततेसाठीची चर्चा थांबेल असंही खान यांनी नमूद केले. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी दबक्या स्वरात, पाकिस्तानला इंदिरा गांधी तर आठवल्या नसतील ना, अशीही चर्चा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानला त्याच्या कुरापतीसाठी धडा शिकवताना पाकचे दोन तुकडे केले होते. त्यातून बांग्लादेशची निर्मिती झाली. हा इतिहास लक्षात आल्यामुळेच इमरान खान घाबरल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.
१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय जगाला ठावूक आहेत. त्यामुळे १९७१ नंतर जगाच्या नकाशावर बांग्लादेशचा उदय झाला. पाकिस्तानची सेना आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत होती. त्यावेळी इंदिरा यांच्यावर परदेशी माध्यमांकडून टीका झाली होती. परंतु, इंदिरा यांनी माध्यमांसमोर भारताची भूमिका कणखरपणे मांडली होती, हा इतिहास आहे.
काही दिवसांपूर्वीच 'बीबीसी'वर एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्यानुसार पाकिस्तानमधील काही भागात १९७१ प्रमाणेच स्थिती आहे. तसेच येथे बंड होण्याची शक्यता आहे. भारतात काँग्रेसचे सरकार आल्यास येथील बंडाला पुन्हा हवा मिळू शकते, यामुळे पाकिस्तान सरकारला भारतात मोदी सरकार हवं, असं त्यात म्हटलं होते.
या सर्व घडामोडींवरून इमरान खान यांचे आजचे ट्विट अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. काही दिवसांपूर्वीच इमरान खान यांनी मोदी सरकारसोबत शांततेची चर्चा होऊ शकत नाही, असं म्हटले होते. आता इमरान खान यांना अशी काय उपरती सुचली की, त्यांना मोदींचा एवढा पुळका आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.