नवी दिल्ली - पश्चिम बंगामध्ये रोड शो करत असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फेरी झडत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे. पश्चिम बंगालमधील अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असून आजपासून येथील प्रचार बंद होणार आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना आयएसआयएसचा म्होरक्या बगदादी याच्याशी केली आहे. योगी यांनी आपल्या अधिकृत ट्विटवरून म्हटले की, बगदादी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ममता 'बगदीदी' होण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, बगदीदी होण्याचं तुमचं स्वप्न भारताचे सपूत मतदानाच्या माध्यमातून उध्वस्त करतील, असंही योगींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपला घाबरून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील सभांचे व्यासपीठ तोडून टाकत आहेत. कामगारांना मारहाण करत आहेत. सभा रोखून बंगालला वाचवत आहेत. मात्र लक्षात ठेवा बंगाल भारताचा अविभाज्य घटक आहे. बगदादीकडून प्रेरणा घेऊन बगदीदी होण्याचं तुमच स्वप्न भारताचे सच्चे सपूत कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा योगी यांनी ममता यांना दिला.
याआधी बंगालमध्ये सभा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र त्यांनंतरही त्यांनी हवडा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी ममता यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शाह यांच्या रोड शो वेळी हिंसा झाल्या त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीची एक्सपायरी डेट निश्चित झाल्याचे योगींनी म्हटले.