गोरखपूर - सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला रविवारी (19 मे) सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या मदतीने एनडीएला 400 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महागठबंधनाचा फारसा परिणाम एनडीएच्या जागांवर पडणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये एकट्या भाजपाला 74 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मतदान करण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून गोरखपूर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. आपणही आळस न करता मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे' असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केले आहे.
सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.