दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (13 मे) आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यापूर्वी रविवारी त्यांनी आमदारांची बैठक घेतली होती. केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून ते सतत पक्षासाठी सभा आणि रोड शो करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पद्धतींबाबत त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. तसेच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व नगरसेवकांना आपली पूर्ण ताकद वापरण्यास सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, "जेलमध्ये माझं खच्चीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. कधी कधी अपमान करायचे. त्यांनी 15 दिवस इन्सुलिन दिले नाही. मी पुन्हा पुन्हा इन्सुलिन मागत होतो. शुगर लेव्हल वाढत होती. मला माझ्या पत्नीला भेटण्यास मनाई करण्यात आली. जेलमधील माझ्या खोलीत दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. 13 अधिकारी देखरेख करायचे. सीसीटीव्ही फीडही पीएमओ कार्यालयाला देण्यात आलं होतं."
"मोदीजींना आम आदमी पार्टी संपवायची आहे, पण मोदीजी देव नाहीत. देव आपल्यासोबत आहे. आज त्यांना आमच्या कामाची भीती वाटते. जेव्हा जेव्हा टीव्ही चॅनलवाले रस्त्यावर उतरतात आणि कोणाला विचारतात तेव्हा प्रत्येकजण म्हणायचा की केजरीवाल यांनी चांगले काम केले आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकायला नको होते. मी जेलमध्ये टीव्ही पाहत होतो."
"मनीषला तुरुंगात पाठवलं तर शाळा बंद होतील असं भाजपावाल्यांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही. त्यांनी केजरीवाल यांना तुरुंगात पाठवलं. दिल्लीतलं काम थांबेल असं वाटलं. मला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशभरातून इंडिया आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी आमंत्रण मिळत आहेत. मी जिथे जाऊ शकतो तिथे जाईन" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.