पंजाबमध्ये आप-काँग्रेस येणार एकत्र? जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता, आपने रोखले ६ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:04 AM2024-04-02T08:04:42+5:302024-04-02T08:06:13+5:30
AAP-Congress Alliance: पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी आप आणि काँग्रेस पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - आप आणि काँग्रेस पक्षाने दोन महिन्यांपूर्वी पंजाब लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे मान्य केले होते. तथापि, दिल्ली, हरयाणा आणि गुजरातमध्ये त्यांची आघाडी आहे. पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी हे दोन्ही पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलेले आहे. काँग्रेसने आता आप नेत्यांना पंजाबमध्ये एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आघाडी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपण एकत्र लढूनच काहीतरी साध्य करू. जर आपण एकमेकांना रोखत राहिलो तर आपण पुढे जाणार नाही. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची जी सभा झाली त्याच्या यशस्वीतेमागे भगवंत मान यांनी महत्त्वाची भूमिका आहे. भाजपने पंजाबमधील सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यातील बहुतांश काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. त्यानंतर खरगे यांनी आघाडीबाबत भाष्य केले आहे.
‘आप’ने केली हाेती स्वबळाची घाेषणा
- ‘आप’ने पंजाबमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तर, ७ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र, ६ जागांवर उमेदवार जाहीर केले नव्हते.
- काँग्रेसने आतापर्यंत १३ पैकी एकाही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. कारण पंजाबमध्ये सातव्या टप्प्यात १ जूनला मतदान आहे.